दिल्ली
विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम पक्षाने अनपेक्षितरीत्या जोरदार मुसंडी मारत
आपले अस्तित्व सिद्ध केले. नेहमीप्रमाणेच याहीवेळी आप पार्टीला मिळालेल्या यशाने
अनेकजण हुरळून गेले आहेत आणि इतकेच नव्हे तर राजकारणातून जवळपास निवृत्त
झालेल्यांना खुर्ची दिसू लागली आहे. परंतु जे दिल्लीत घडले ते इतर ठिकाणी शक्य आहे
का ? मुळात दिल्ली मध्येच ते का घडले या प्रश्नाची उत्तरे शोधल्यास हेच जाणवेल कि
आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनून संपूर्ण देशात विस्तारायचे असल्यास अजून खूप लांब
पल्ला गाठायचा आहे.
दिल्लीतील
यश
अरविंद
केजरीवाल यांचे सर्वात महत्वाचे बलस्थान म्हणजे त्यांची जी ओळख सर्वाना झाली ती
अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून. जनमाणसात त्यांची स्वच्छ आणि सामान्य
अशी प्रतिमा निर्मिती या आंदोलनाच्या माध्यमातून झाली. व त्यांनी सामान्य
व्यक्तींच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रचार. त्यांच्या
जाहीरनाम्यात व्यवहारीकतेपेक्षा भावनिक आश्वासनाचा भर सामान्य मतदारांना भुलवून
गेला. मतदारांच्या द्र्ष्टीने सुविधा मिळणार हि भावना महत्वाची ते निर्माण कशी
होणार याच्या भानगडीत सामान्य मतदार पडत नाही. दुसरे असे कि, दिल्लीतील निर्भया
बलात्कार प्रकरणी झालेले आंदोलन. ज्यामध्ये दिल्लीतील तरुणाई रस्त्यावर उतरली होती.
या एका घटनेने सामान्य मतदारांच्या मनात प्रस्थापित व्यवस्था, राजकीय पक्ष यांच्या
विरुद्ध प्रचंड चीड निर्माण केली. करिता त्यांनाही असे वाटू लागले कि बदल घडलाच
पाहिजे अआणि त्यासाठी आपण स्वत: काहीतरी केले पाहिजे. दिल्लीतील आप पक्षाच्या
यशाला हि पार्श्वभूमी अत्यंत निर्णायक ठरली. दिल्लीतील मध्यमवर्गीयांचा महागाई, भ्रष्टाचार याविरुध्द चा संताप आप चे
नेते मांडू लागले आणि म्हणून त्यांचे रुपांतर मतपेटीत झाले खरे. पण म्हणून देशात
सर्वच ठिकाणी आप ला यश मिळेल असे मानने शुद्ध भाबडेपणाचे ठरावे. कारण दिल्लीतील
आंदोलनाची पार्श्वभूमी देशात इतरत्र नाही. मुंबईत अण्णांच्या नेतृत्वाखालील
आंदोलनाचा कसा फज्जा उडाला हे सर्वांनी बघितले आहे. दुसरे असे कि आम आदमी पक्षाकडे बोटावर मोजता येणारे नेते
सोडले तर नेतृत्वाची वानवा आहे. आणि सध्याच्या नेते मंडळीतही वाचाळवीर जास्त आहेत.
फारतर इतर पक्षातील असंतुष्ट नेते आम आदमी पक्षात येतील.पण ते काही पक्षाचे
आधारस्तंभ असू शकत नाहीत.
संघटना आणि
वैचारिक बैठक
आम आदमी
पक्षाची प्रमुख अडचण आहे ती संघटना आणि वैचारिक बैठकीची. पक्षाच्या जमाखर्चाचे
हिशोब वेबसाईट वर टाकणे हे चांगलेच आहे परंतु त्याने काही संघटना बांधणी होत नाही.
पारदर्शकता हे बलस्थान नक्कीच आहे पण या एका मुद्याणे वैचारिक जडणघडण होणार नाही.
मुळात आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातून झालेला आहे. एखादा
राजकीय पक्ष केवळ आंदोलनाच्या माध्यमातून चालवणे कसे काय शक्य आहे. सामाजिक ,
आर्थिक विचार कार्यपध्दती, आंतरराष्ट्रीय धोरण या बाबी दुर्लक्षून चालणार नाही.
कार्यकर्ता घडतो तो एका मजबूत विचार प्रक्रियेतून. त्याची वैचारिक बांधणी
होण्यासाठी पक्की वैचारिक बैठक असणे अत्यंत आवश्यक असते. त्याचे व्यक्तिमत्व त्या
दृष्टीने परिपक्व होत जाते.आम आदमी पक्षात नेमकी याचीच कमतरता आहे. कोणत्या
विचारांनी प्रभावित होऊ राजकीय क्षेत्रात काम करणार्यांनी आम आदमी पक्षाकडे आकर्षित
व्हायचे ? फक्त भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे एवढे वाक्य पुरेसे नाही. आणि समाजवाद,
धर्मनिरपेक्षता वगैरे गुळगुळीत झालेले शब्द वापरून किंवा सतत प्रस्थापित राजकिय
पक्ष हे बदमाश आहेत हेच सांगून कार्यकर्त्यांचे प्रबोधन होणार असेल तर मग मात्र आम
आदमी पक्षाचे भवितव्य दिल्लीतही फारसे टिकाऊ नसेल. कारण हे शब्द आणि त्याच्या
विरुध्द्द वागणारी मंडळी यांचे भाषण ऐकून नागरिक अगोदरच खूप निराशादायक आहेत.
परिणामी संघटना म्हणून आम आदमी पक्षाची वैचारिक बाजू अशक्तच आहे.
दिल्लीतील निकालाचा
संदेश
मध्यमवर्गीय
महागाई, भ्रष्टाचार यांनी त्रस्त झाले असून त्यांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला
आहे. हा मुख्य संदेश आम आदमी पक्षाच्या विजयानंतर सर्वच
राजकीय पक्षांना मिळतो. मात्र असे असले तरी आपले स्थान अत्यंत बळकट आहेत असे आम
आदमी पक्षाने गृहीत धरू नये. कारण आम आदमी पक्षाला मिळालेले मतदान हे ‘वरीलपैकी
कोणीही नाही ’ याचे सुध्दा असू शकते. थोडक्यात काय तर मूल्यहीन राजकारनाला सामान्य
जनता वैतागली आहे. तसेच ढोंगीपणा आता सहन केला जाणार नाही हाच निकालाचा मतितार्थ
समजून प्रत्येक राजकीय पक्षाने बोध घ्यावा.
(हा लेख
दैनिक लोकसत्तामध्ये दि. १३/१२/२०१३ रोजी प्रसिध्द झालेला आहे.)