देशाचा पंतप्रधानांचा दौरा हा प्रत्येक भारतीयासाठी
आकर्षणाचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीच्या
प्रचारानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी #PMNarendraModi हे दि. 20 रोजी परभणी येथे येणार आहेत. यानिमित्ताने
ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी निवडणूक प्रचार आणि पंतप्रधानांचा दौऱ्यासंदर्भात
आठवणी जागवल्या आहेत. समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलेल्या आठवणी त्यांच्याच
शब्दात...
पंतप्रधान पदावर असताना परभणी ला भेट देणारे श्री
मोदीजी हे तिसरे पंतप्रधान ठरतील.
यापूर्वी पंतप्रधान राजीव गांधी यांनी डिसेंबर १९८४ मध्ये इदगाह
मैदानावर रामराव लोणीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग एप्रिल 1991 मध्ये परभणी लोकसभा जनता दलाचे
उमेदवार प्रताप बांगर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आले होते. जिंतूर आणि पुर्णा येथे
त्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या मराठवाड्याचे दौऱ्याचे वैशिष्ट्य हे
की ते औरंगाबाद ते पुर्णा पर्यंत सडक मार्गाने आले होते.
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या दोन वेळेस परभणीला जाहीर सभे साठी आल्या होत्या. 16 फेब्रुवारी 1978 रोजी त्यांची सायंकाळी आठ वाजता इदगाह मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती, परंतु सडक मार्गाने रात्री साडेबारापर्यंत त्या येऊ शकले नाहीत म्हणून ती सभा रद्द करून दुसऱ्या दिवशी सकाळी घेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या वेळेस 16 ऑक्टोबर 1979 रोजी त्या आल्या. इदगाह मैदानावर त्यांची सभा झाली. हा दिवस इंदिरा गांधींना आणि परभणीकरांना चांगलाच लक्षात राहिला. कारण त्या हेलिकॉप्टरने परभणी जवळ आले असताना कृषी विद्यापीठात मजुरांनी कचरा जळला तो धूर पाहून हेलिकॉप्टर चालकाला वाटले की येथेच हेलीपॅड आहे पण तेथील वातावरण पाहून हेलिकॉप्टर परत उंच उडाले आणि नूतन जिंतूर रोडला जेथे हेली पॅड होते तेथे उतरले. सभा संपल्यानंतर त्या शनिवार बाजारातील डाक बंगल्यात थोड्यावेळ थांबल्या. ओम प्रकाश देवडा, केंद्रीय गुप्तचर अधिकारी विवेक देशपांडे, माहिती अधिकारी श्रीराम मोदानी, माणिकरावजी भांबळे ,बाबूराव गोरेगावकर आणि मी (शरद देऊळगावकर) असे आम्ही तेथे उपस्थित होतो. तेवढ्यात तेथे हिंगोली तालुक्यातील सवडगावचे वाघमारे नावाचे चर्मकार तिथे आले आणि इंदिरा गांधींना विनंती केली की_" मी आपल्या वडिलांचे (नेहरूजींचे )पायाचे माप घेऊन त्यांना जोडे शिवून पाठवले होते ..मला आपल्या पायाचे माप घेऊन आपणास जोडे शिवून द्यायचे आहेत.
" त्यावर आपल्या पायाचे माप देत इंदिरा गांधी मिश्किलपणे म्हणाल्या "अब जुते तो खूब मिले है"
त्यानंतर इंदिरा गांधी हेलिकॉप्टरने नांदेड कडे
जाण्यास निघाल्या परंतु रहाटी जवळ हेलिकॉप्टरमध्ये बिगड झाला त्यामुळे त्या
रानावनात थांबल्या. दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण करत असताना वसमत
जवळ पुन्हा ते बिघडले आणि कसेबसे शासकीय प्रशालेच्या मैदानात उतरण्यात आले
त्यामुळे काही तास इंदिरा गांधी त्या शाळेच्या मैदानात थांबल्या. त्यांना
पाहण्यासाठी लोकांची
प्रचंड गर्दी तिथे होऊ लागली. नांदेडहून शंकरराव चव्हाण कार घेऊन आले आणि इंदिरा
गांधींना नांदेडला घेऊन गेले.
1977 मध्ये जनता पक्षाचे नेते खासदार
चंद्रशेखर पुढे ते पंतप्रधान झाले ते मानवाच्या सभेचे निमित्ताने परभणी ला आले
होते. त्या दिवशी दिवसभराच्या प्रवासात त्यांना जेवण भेटलेच नव्हते परभणीच्या
रेल्वे स्थानकावर विश्रामगृहात जेव्हा ते थांबले, तेव्हा
त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले की-- मुझे भूक लगी है ,तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर मधुकरराव चौधरी यांनी घरी जाऊन
जेवणाचा डबा घेऊन आले ,तोपर्यंत ते रेल्वेत बसलेले होते ,कसाबसा गाडी निघताना त्यांच्या हातात डबा दिला. रेल्वे तिकिटाचे आरक्षण
नसल्यामुळे त्यांना पूर्णेपर्यंत प्रथम श्रेणीतून विनातिकीट
आणि उभे राहून प्रवास करावा लागला.
गंगाजल यात्रेच्या निमित्ताने 1980 अटल बिहारी बाजपेयी परभणीला येऊन
गेले होते. त्यांची जाहीर सभा स्टेडियम मैदानावर झाली होती.(नंतर ते पंतप्रधान
झाले)या गंगाजल यात्रेत नरेंद्र मोदी स्वयंसेवक या नात्याने सहभागी झाले होते असे
कळते.
पंतप्रधान नसताना पी व्ही नरसिंहराव सेलू येथील हिंदी मराठी ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी(1972-73) आले होते. नूतन विद्यालय सेलू चे मुख्याध्यापक गोविंदराव देशमुख हे त्यांचे वर्गमित्र होते. त्यांच्या आग्रहास्तव सेलू ला ते आले होते( पुढे तेही पंतप्रधान झाले).
शरद देऊळगावकर