परभणी: निवडणूक म्हटले की, सर्वात पहिल्यांदा
निवडणूक चिन्हाची चर्चा होते. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा बोलबाला राहिला
आहे. त्याचे सर्वात मोठे श्रेय धनुष्यबाण या पक्षचिन्हाला जाते. शिवसेना व
धनुष्यबाण या सूत्राला परभणीकरांनी आजपर्यंत डोळे झाकून पसंती दिली आहे. मात्र आगामी
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण, कॉंग्रेसचा पंजा राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे
घड्याळ किंवा भारतीय जनता पक्षाचे कमळ यापैकी कोणतेही पक्षचिन्ह असणार नाही. महाविकास
आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे संजय जाधव यांची निवडणुक निशाणी मशाल आहे तर महायुतीकडून
निवडणूक लढवत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे शिट्टी चिन्हावर नशीब
आजमावत आहेत.
मुळात शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळण्यात
परभणीचा मोठा वाटा आहे. राज्यात शिवसेनेला प्रथमच सहा लोकसभा मतदारसंघात विजय
मिळाला होता. त्यात परभणी येथून अशोक देशमुख हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले
होते. त्यानंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत पक्षचिन्ह मिळाले. सुरेश वरपूडकर
यांचा एकमेव अपवाद वगळता आजपर्यंत शिवसेनेचा उमेदवार एकदाही पराभूत झालेला नाही.
विशेष म्हणजे ज्या खासदारानी शिवसेना सोडली त्यांचे राजकीय पुनर्वसन एकदाही झालेले
नाही. त्यामुळे धनुष्यबाणाविषयी परभणीकरांमध्ये मोठे आकर्षण दिसून येते.
शिवसेनेतील बंडाळीनंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला मिळाला. तर परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने बूथ स्तरापर्यंत तयारी केली होती. त्यामुळे उबाठा गटाची मशाल आणि भाजपच्या कमळ यामध्ये लढत होईल अशी अपेक्षा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश विटेकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेतला. मात्र झाले वेगळेच. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीकडूनही प्रयत्न केले. त्यामुळे तडजोडीच्या राजकारणात अखेर महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांना शिट्टी हे पक्षचिन्ह मिळाले आहे. त्यामुळे मशाल आणि शिट्टी या निवडणूक चिन्हामध्ये लढत होत आहे. परिणामी यावेळी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण, भाजपचे कमळ, कॉंग्रेसचा पंजा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ यापैकी कोणतेही पक्षचिन्ह असणार नाही.