२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि भाजप युतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच झाली. अखेर प्रकरण युती तुटेपर्यंत गेले. याचा फायदा घेत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्र्वादी कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच सत्तेच्या खुर्चीवर बसले. सत्तेची अडीच वर्ष पूर्ण होत असतानाच मोठी खेळी खेळली गेली आणि शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरात मार्गे थेट गुवाहाटीला प्रस्थान केले. एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली. अखेर सरकार अल्पमतात आल्याचे दिसून येताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेना व भाजप युती पुन्हा सत्तेत आली आणि एकनाथ शिंदे #Eknath_Shinde मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर पुन्हा एकदा धक्का देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे #Ajit_Pawar अजित पवार यांनीही महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अशा तऱ्हेने शिवसेना आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेसमध्ये मोठी फुट पडली. शिवसेना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्र्वादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी विभागणी झाली.
शिवसेना उबाठा गट #ShivsenaUBT आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र
पवार पक्ष #NCP यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. कारण, भाजपने शासकीय
यंत्रणांचा गैरवापर करत शिवसेना व राष्ट्र्वादी कॉंग्रेस या पक्षात फुट पाडली असा
आरोप शिवसेना उबाठा व राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार #Sharad_Pawar पक्षाकडून नेहमीच केला
जातो. या दोन्ही पक्षातील नेत्यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना गद्दार असे संबोधले
आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार
निवडून आले तर जनतेमध्ये त्यांच्यात सहानुभूती असल्याचे दिसून येईल व एकनाथ शिंदे
आणि अजित पवार यांच्या निर्णयाला जनतेने नाकारल्याचे स्पष्ट होईल. याउलट जर पराभव
स्वीकारावा लागला तर जनता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठीशी आहे हाच संदेश
दिला जाईल व शिवसेना उबाठा गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
राजकीय आव्हान कमकुवत होईल.