विकृत मनोरंजन

0

 

स्वातंत्र्य व त्यासोबतच्या असणा-या जबाबदारीच्या संदर्भात मागील लेखातच चर्चा झाली होती. त्यात असेही नमूद केले होते की, स्वातंत्र्याला विवेकाचा आधार नसेल तर त्याचे विकृती बनते. याची प्रचीती यावी अशी घटना नुकतीच घडली. एआयबी रोष्ट अशा नावाच्या शो मध्ये सार्वजनिक सारासार विवेकाचे धिंडवडे निघाले. समाजाच्या एका वर्गात  पेज थ्री संस्कृती प्रचलित आहे. त्याचेच सवंग व किळसवाणे प्रदर्शन एआयबी रोष्ट सारख्या कार्यक्रमामधून होत असते. बिग बॉसहा सुध्दा असाच एक कार्यक्रम आहे.

 

एआयबी रोष्टहा कार्यक्रम अत्यंत हीन दर्जाच्या विनोदासाठी आयोजित केला जातो. ज्यामध्ये कलाकार अत्यंत भीबत्स प्रकारचे विनोद करतात. विशेष म्हणजे प्रेक्षकात महिला असतानाही, महिलांच्याविषयी अत्यंत किळसवाणे विनोद केले जातात. मनोरंजनाच्या नावाखाली सार्वजनिकरीत्या इतक्या हीन दर्जाचे विनोद करणे केवळ असभ्यपनाचेच नव्हे तर विकृत बुद्धीचे लक्षण आहे.

 

दर्जेदार विनोदी कथा,साहित्य, कार्यक्रम निर्माण करण्याची अथवा ते समजण्याची लायकी नसल्यानेच असल्या प्रकारची घाण तयार होते. मनोरंजन करायचे म्हणून कोणी रस्त्याने नागडा फिरत नाही अथवा वाट्टेल ते बोलत नाही. अशा प्रकारचे वर्तन करण्यात ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. स्वत:च्या मनोविश्वात गुंग असल्याने सामाजिक भान हरवून गेलेले महाभाग अशा प्रकारच्या उद्योगात रममाण होतात. सामाजिक भान असलेला व्यक्ती स्वत:च्या वागण्या-बोलण्या विषयी सावधान असतो. सार्वजनिक आचरण करताना अश्या व्यक्तीचे वागणे-बोलणे अधिक जबाबदारीचे असते. परंतु भान सुटलेल्या विकृतांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.असले माजोरडे मनोरंजन त्यांनी खुशाल आपल्या घरी करावे त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही.प्रश्न आहे तो अशा धरणीला भार असलेल्या सेलिब्रिटीच्या सार्वजनिकरीत्या उद्दाम वागण्याचा. एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत, ज्ञानी असला तरी यामुळे त्याला आर्थिक दृष्ट्या कमकुवत, अशिक्षित जनतेला अपमानित करण्याचा, त्यांच्या भावना दुखावण्याचा परवाना मिळला असे होत नाही. सुसंस्कृत समाजात वावरताना सार्वजनिक वागण्या बोलण्याचे नियम पाळले जाणे अपेक्षित आहे.

 

महिला,वयोवृध्द ,अतिथी यांच्या विषयी आदराचीच भावना ठेवणारी शिकवण भारतीय संस्कृतीत आहे. म्हणूनच त्यांच्या सोबत बोलताना जाणीवपूर्वक चांगले शब्द बोलले जातात. दैवदुर्विलास म्हणजे ग्रामीण भागातील एखाद्या अशिक्षित व्यक्तीला हे नैसर्गिकरीत्या कळते; परंतु समाजाच्या उच्चभ्रू वर्गात मनोरंजनाच्या नावाखाली सार्वजनिकरीत्या महिलांविषयी अत्यंत हीन दर्जाचे शब्द विनोद म्हणून त्यांच्या समोरच वापरले जातात. तसेच  ग्रामीण बोलीभाषेत बोलल्यास  त्याच्याकडे अत्यंत तुच्छ नजरेने पाहिल्या जाणा-या वर्गात महिलांविषयी असभ्य शब्द प्रयोग करताना काहीच संकोच वाटत नाही. दुटप्पीपणाचा हा प्रकार अत्यंत माजोरडा आहे.

 

या सगळ्या प्रकारातून एक प्रमुख बाब अधोरेखित होते ती अशी की, उच्चभ्रू वर्गात आजही पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानली जाते. चांगले,विधायक शिकण्यास विरोध असण्याचे कारण नाही; परंतु वाईट याचे वाटते की आपण आंधळेपणाने स्वीकारतो. त्यांच्या कडून ज्ञान साधना, संशोधनाची आवड,  स्वच्छता, नियम पाळणे, देशाविषयी जाज्वल्य अभिमान या शिकण्यासारख्या गुणांकडे दुर्लक्ष केले जाते व व्यसनाधीनता,अनैतिक आचरण यासारख्या टाकाउ सवयी लवकर आत्मसात केल्या जातात. रेव्ह पार्ट्या सारख्या संकल्पना अशा स्वीकारल्या जातात की जणू काही यामुळे आपण आधुनिक विचारांचा असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. केवळ आधुनिक विचारांचा आहे म्हणून पाश्चिमात्य आचार-विचारांचे अंधानुकरण करण्याची वृत्ती ही नैतिक अध:पतन होण्याचे प्रमुख कारण आहे. दूरदर्शन व चित्रपट माध्यम हे समाजात अशा प्रकारची मनोवृत्ती रुजवण्याचे प्रमुख साधन बनले आहे. विचारांनी कृती घडते,कृतीने सवयी जडतात व सवयीनी चारित्र्य घडते याची जाणीव आपणास आहे. विचारांचे निर्माण होते ते ऐकणे व बघण्याने. याकरिता दृष्टी व कान यांना नेहमी चांगल्या विचारांच्या संपर्कात ठेवले पाहिजे. परंतु एआयबी रोष्ट’,सारख्या कार्यक्रमातून मनोरंजनाच्या नावाखाली अत्यंत विकृत विचारांचे प्रसारण केले जात आहे. यामुळे येणारी पिढीला उज्ज्वल चारित्र्य निर्माण नकोसे वाटले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. एखाद्या  अश्लील स्वरूपाच्या चित्रपटापेक्षाही हे अत्यंत घातक आहे. कारण असा चित्रपट मुळातच अश्लील आहे हे आपणास ठाऊक असते,परंतु जेव्हा मनोरंजन म्हणून प्रसारित होणा-या कार्यक्रमात विकृती,असभ्यपणा प्रसारित होत असेल तर त्याने समाजात वेगळा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे सार्वजनिकरीत्या मनोरंजन म्हणून प्रसारित होणा-या कार्यक्रमावर अंकुश असायला हवा. अन्यथा अत्यंत घृणास्पद शब्द, अश्लील शेरेबाजी,टिंगलटवाळ्या यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागेल.             

 

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!