प्रत्येक व्यक्तीला आपले मित्र निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
सर्वसाधारणपणे संकटात साथ देणारा, निरपेक्षपणे मदत करणारा अशी मित्राची व्याख्या असली तरी राजकारणात त्याचे
संदर्भ अमूलाग्र बदलतात. म्हणजे इथे जे दिसते ते कधीच नसते. म्हणून राजकारणात
मित्र निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते. यात जो फसला त्याच्या वाटेला पश्चात्ताप
शिवाय काहीच येत नाही.राज्याच्या राजकारणातील सारीपाटाचा खेळ बघता योग्य मित्रांची
निवड किती महत्त्वपूर्ण आहे हेच अधोरेखित होते. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन कॉंग्रेस अशा
संभाव्य आघाडीची चर्चा आहे. वरकरणी पाहता शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाच्या
गुलाबाचे फुल
दिसत असले तरी
त्याच्या आजूबाजूला भरपूर काटे आहेत. भाजपशी बंद केलेल्या चर्चेने आघाडीसोबतच्या
वाटाघाटीत शिवसेनेला नमते घ्यावे लागणार हे उघड आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर बैठका, कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांसोबत फोनवरून
चर्चा,
अन राष्ट्रवादी
कॉंग्रेसचा सावध पवित्रा या सर्व प्रकारात शिवसेना गुरफटून जात आहे.
राज्याच्या राजकारणात मागील पंधरा दिवसांपासून सत्तास्थापनेचे मंथन चालू आहे.
केवळ
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अन शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी
शिवसेना पारंपारिक शत्रू असलेल्या काँग्रेस सोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे.
अशा प्रकारची आघाडी झालीच तर सेनेसाठी हा निर्णय राजकीय पक्ष म्हणून तात्कालिक
फायदेशीर दिसत असला तरी दीर्घकालीन नुकसानदायक असेल. याचे कारण असे की, शिवसेनेची उभारणी,बांधणी व संवर्धन एक सामाजिक संघटना म्हणून
झाले आहे. त्यासाठीची वैचारिक बैठक मराठी माणूस आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर
आधारलेली आहे.मराठी म्हणून हिणवल्या गेलेल्या अन हिंदू म्हणून अपमानित केलेल्या
क्षीण आवाजाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीमत्वाने भारदस्त आवाज दिला
अन समस्त मराठी जनांचा आणि हिंदू मनांचा असा काही ठाव घेतला की महाराष्ट्राच्या
प्रत्येक नागरिकाच्या मन:पटलावर हे नाव कायमचे कोरले गेले.राज्यातील तरुण आपल्या
छातीवर शिवसैनिक हे बिरुद अभिमानाने मिरवु लागला. त्यामुळेच शिवसेनेने राजकीय
पर्याय दिल्यानंतर मुंबई महानगरपालिका, विधानसभा आणि आणि लोकसभा पर्यंत सेनेचा आवाज गर्जु लागला. राज्याच्या राजकीय
इतिहासात शिवसेनाप्रमुख व शिवसेना हे नाव सुवर्ण अक्षरांनी झालं कोरले गेले.
साहेबांचा आदेश माननारा कडवट शिवसैनिक ही शिवसेनेची शक्ती आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातून तो घडला आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणाच्या
राजकारणाने मराठी माणसाची केलेली कुचंबणा व धर्मनिरपेक्षतावादाच्या नावाखाली हिंदू
मनाची केलेली विटंबना याचा साक्षीदार बनून लढाई लढण्यात त्याच्या उमेदीची वर्षे
गेली आहेत.
आणि आज सत्ताप्राप्तीसाठी त्याच काँग्रेस अन राष्ट्रवादीच्या कुबड्यावर केलेली
आघाडी शिवसैनिकांना पचनी पडेल याबद्दल शंका वाटते.
ज्यांना राजकीय पक्ष म्हणून शिवसेना यशस्वी व्हावी असे वाटते त्यांनी अगोदर
शिवसेनेचे संघटना म्हणून स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. हिंदुत्व आणि मराठी माणूस या
मुद्द्यांबाबत जराही तडजोड स्वीकारली तर कदाचित तात्कालिक फायदा होईलही परंतु
संघटना म्हणून शिवसेनेचे दीर्घकालीन नुकसान होण्याची जास्त शक्यता दिसते.
यासंदर्भात बरेच जन भाजप अन पीडीपीच्या काश्मीरबद्दलच्या युतीबद्दल बोलतात.
याबाबतीत एकच मुद्दा महत्वाचा वाटतो व तो म्हणजे महाराष्ट्र म्हणजे काश्मीर नाही.
तत्कालीन परिस्थितीत काश्मीरमध्ये कलम ३७० लागु होते. त्याठिकाणी राष्ट्रवादी
विचाराच्या पक्षाला किमान सत्तेत सहभागी होता येणे हाच मोठा विजय होता. आणि भाजपने केले म्हणून आम्हालाही तसे करण्याची मोकळीक आहे हा चुकीचा
समज आहे. याचे कारण भाजप अन शिवसेना या दोन राजकीय पक्षाच्या बांधणीत फरक आहे.
राज्यात जर शिवसेना,
कॉंग्रेस अन
राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यात सर्वात कठीण मुद्दा पहिल्या अडीच वर्ष
मुख्यमंत्रीपदाचा असेल. शिवसेनेने भाजपशी चर्चा थांबवून एक पर्याय बंद केल्याने
आता वाटाघाटीत शिवसेनेला नमते घ्यावे लागण्याची जास्त शक्यता आहे. कारण कॉंग्रेस
अन राष्ट्रवादी च्या पाठिंब्याशिवाय शिवसेना सत्ता स्थापन करु शकणाऱ नाही हे
सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली अडीच वर्षे
मुख्यमंत्रीपद मागितले तर शिवसेनेच्या भाजपशी काडीमोड करण्याला अर्थ उरणार नाही.
आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच तर त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल का ? की प्रत्येक वेळी जर काँग्रेसनं कडे बघावे
लागेल ? काँग्रेसच्या पाठिंब्यावर झालेला मुख्यमंत्री स्वतंत्र निर्णय घेऊ घेऊ शकतो हे
केवळ स्वप्नरंजन आहे हे कर्नाटकातील उदाहरणावरून दिसून आले आहे.
दुसरे असे की,
राष्ट्रवादी
काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना दोन पर्याय आहेत. एक
शिवसेनेचा व दुसरा भाजपचा. शिवसेनेचा पर्याय निवडला तर राज्यातील सत्तेत वाटा
मिळेल परंतु सोबत काँग्रेसची मदत घ्यावी लागणार. शिवाय भाजपशी तर वैर निर्माण
होइलच. याऐवजी भाजपचा पर्याय निवडला तर अशा स्थितीत काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज
असणार नाही याशिवाय केंद्रांमध्ये ही भाजपच्या गुड बुक मध्ये स्थान मिळेल.
अशाप्रकारे फायद्या तोट्याचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंब्याचा विचार करेल आणि त्यांनी जर
शिवसेना ऐवजी भाजपचा पर्याय निवडला तर शिवसेनेची स्थिती कशी असेल हे सांगायला
भविष्यवेत्त्याची गरज असणार नाही. या सर्व मंथनात शिवसेनेची कुचंबणा होत आहे यात
शंका नाही. कारण,
आजपर्यंत सेना
नेत्यांना राजकीय चर्चा साठी मातोश्रीबाहेर कधीही जावे लागले नाही. नेत्यांच्या
मनधरणीचा तर प्रश्नच नाही. एकूण काय तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत
असंगाशी संग करून केल्याने शिवसेनेची मूलभूत चौकट खिळखिळी झाल्यास आश्चर्य वाटायला
नको.