गिधाडानो आणखी किती लचके तोडाल ?

3



प्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी इतर प्राण्यांच्या हाड-मासावर अवलंबून रहावे लागते. जसे की, गिधाडे. ही गिधाडे प्राण्यांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. अनेकवेळा ही गिधाडे मेलेल्या किंवा अर्धमेलेल्या प्राण्याच्या शरीराचे लचके तोडण्यासही धजावतात. त्याच्या या कृतीबद्दल गिधाडांना कणमात्रही दोष देता कामा नये, कारण ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. वाईट याचे वाटते की, मनुष्य प्राण्यात सुध्दा ही गिधाडी वृत्ती वेगाने फोफावत आहे. 
 
खरे पाहता मानवाला जीवंत राहण्यासाठी कोणाही व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही केवळ क्षणभंगुर सत्ता अथवा आर्थिक उन्नती साठी मानवातील ही गिधाडे राष्ट्रहिताचे लचके तोडू पाहत आहे. अर्थात राष्ट्रहिताचे लचके तोडण्याची ही काही पहिलीच वेळ आहे असे नव्हे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताला बाधा पोहोचली तेव्हा तेव्हा या गिधाडांनी लचके तोडून आपले पोट भरले आहे. नागरिकता संशोधन विधेयक नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत  होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले. परंतु यानिमित्ताने समस्त गिधाडांनी अत्यंत आक्रमकपणे राष्ट्रहीताचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे.
सर्वप्रथम नागरिकता संशोधन कायदा समजून घेऊ.
 
हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या देशातील अल्पसंख्य असलेल्या हिंदू, ख्रिश्चन, सिख बौध्द, जैन यांना भारतात नागरिकत्व प्रदान करतो. तेथील नागरिक प्रतिवर्षी मोठ्या संख्येने भारतात येतात, व्हिसाची मुदत संपली असतानाही राहतात. अशा नागरिकाना भारतातील नागरिकत्व नसल्याने त्यांना येथील कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ तर घेता येतच नाही शिवाय त्यांच्यावर अवैध प्रवासी म्हणून गुन्हे दाखल होतात. याकरिता नागरीकता संशोधन कायदा त्यांना नागरिकत्व सन्मानाने प्रदान तर करतोच शिवाय त्यांच्यावर अवैध प्रवासी म्हणून चालू असलेल्या सर्व कोर्ट केसेस रद्द करतो.  
 
या कायद्याबदल सर्वात मोठा भ्रम भारतातील मुस्लिम समुदायात पसरविला जात आहे. या कायद्यामुळे  भारतीय मुस्लीमाना देशातून हाकलले जाणार आहे. असे सर्रासपणे सांगितले जात आहे. असा भ्रम पसरविणारे गिधाडे लचके तोडून केवळ पोट भरणारे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. मात्र दु:ख याचे वाटते की, ही गिधाडे विद्यार्थ्यांना लक्ष्य बनवत आहेत आणि विद्यार्थीही त्याला बळी पडत आहेत. या कायद्याचे स्वरूप त्यातील तरतुदी एवढ्या स्पष्ट असताना त्याबद्दल अत्यंत आक्रमकपणे गैरसमज पसरविल्या जात आहे.
 
 
या कायद्याचा उद्देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातील अल्पसंख्य नागरिकांना भारताचे नागरीकत्व देण्याचा आहे. हे तीन देश अधिकृतरीत्या मुस्लीम देश आहेत. त्यामुळे तेथे मुस्लीम अल्पसंख्य असण्याचा प्रश्नच नाही. तेथील अल्पसंख्य समुदायावर होणारे अत्याचार, बळजबरीने धर्मांतरण हे लपून राहिलेले नाही. त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे. आणि  म्हणूनच तेथील अल्पसंख्य समाजाची घटणारी संख्या याची निदर्शक आहे. अशा परिस्थितीत तेथील अल्पसंख्य नागरिकांसाठी हा कायदा नवसंजीवनी ठरणार हे निश्चित.            
आता राहिला प्रश्न विरोधाचा. तर विरोध करणारी मंडळी कोण आहेत हे बघितले तर त्यात प्रामुख्याने तेच लोक आहेत जे केवळ मोदी विरोधाने पछाडलेले आहेत. त्यांना गैरमुस्लीम अल्पसंख्य नागरिकांविषयी जराही आपुलकी दिसत नाही. मोदी, भाजप हे केवळ मुस्लीम विरोधी आहेत व त्यांना हिंदुराष्ट्र निर्माण करायचे आहे अशी भीती मुस्लीम समुदायात निर्माण करायची व त्यातून मतांचे ध्रुवीकरण करायचे हेच एकमेव उद्दिष्ट स्पष्टपणे दिसत आहे. यांची मजल नागरी युद्ध भडकावण्यापर्यंत जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
 
आपल्या उदरनिर्वाहाच्या सोयीसाठी ही गिधाडे राष्ट्रहिताची, माणुसकीची हत्या करून त्याचे मांस खाण्याच्या तयारीत आहेत. यावेळी विद्यार्थी हे त्यांचे साधन आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत समाजातील सज्जन शक्तींनी ठामपणे उभे राहुन या गिधाडांची ओळख करून द्यावी. जेणेकरून किमान काही विद्यार्थ्यांचे आयुष्य नष्ट होण्यापासून वाचेल. अन्यथा ही गिधाडे राष्ट्रहिताच्या. माणुसकीच्या मांसाचे लचके तोडतच राहतील.  

Post a Comment

3Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!