दुर्दशेचे बाप ब्रह्मचारी

0


" बाळाचे बाप ब्रह्मचारी " नावाचा एक मराठी चित्रपट आहे. वास्तविक या वाक्यातील परिस्थिती शब्दश: शक्य नाही कारण बाळाचा बाप ब्रह्मचारी कसा असू शकेल ? पण देशात भ्रष्ट नेत्यांनी जे दुर्दशा नावाचे अपत्य जन्माला घातले आहे त्याचे पितृत्व नाकारत आम्ही तर ब्रह्मचारी आहोत असेच अगदी ठामपणे सांगत आहेत.आपला दिवस सुरु होतो घोटाळ्याच्या बातम्यांनी आणि संपतो तो वाढलेल्या महागाईच्या बातम्यांनी. यात थोडे समाधान असे कि ,अलीकडे काही नेते प्रामाणिकता जपत आहेत म्हणून ते जाहीरपणे सांगतात कि "घोटाळे लोक विसरून जातील " , " लग्न जुने झाल्यावर मजा नाही ", "अराजक माजलेल्या देशातील मांगो आम आदमी ". चुकून का होईना त्यांचा आतला आवाज (या आवाजाला त्यांच्या पक्षात मोठेच वजन ) बाहेर आला असो.वाईट या गोष्टीचे वाटते कि,जबाबदार व्यक्तींना अत्यंत बेजबाबदारपणे वागताना त्यांना काहीच वाटत नाही. म्हणून अनकेदा त्यांच्या हेतूवर शंका येणे गैर का मानावे ? सिंचन घोटाळा उघड करणाऱ्या अभियंता पांढरे यांना सरळ वेडे ठरवले जाते. रोबर्ट वढेरा यांचे गैरव्यवहार उघड करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना संविधान विरोधी ठरवले जाते. याचा अर्थ असाच निघतो कि "खबरदार आमच्यावर आरोप कराल तर " . हा इशारा व्यक्ती बाबतीत मर्यादित नाही तर कॅग सारख्या संवैधानिक संस्थांना सुद्धा दिला जातो. हे भयंकर वाटत नसेल तर आपली संवेदना मरून गेली आहे असेच म्हणावे लागेल.
जबाबदारी कोणाची ?
घोटाळा उघड झाला त्या प्रत्येकवेळी जबाबदारी नेमकी कोणाची होती हे काल्ण्यासाठीच 2 ते 3 वर्ष निघून जातात. प्रत्येकजन सांगतो कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सही केली मग ती बघून मी सुद्धा मान्यता दिली किंवा वरिष्ठाकडून सूचना आल्या आम्ही तसे केले. असेच सगळीकडे चालले आहे. या बजबजपुरीत एकालाही जबर शिक्षा होत नाही. परिणामी कर्त्यव्यात कसूर करणे नित्याचेच होते आणि याची किंमत संबंध देशाला चुकती करावी लागते. कधी कोणाला आपले प्राण देऊन तर कधी आपली संपत्ती देऊन. आपण दररोज विकसित भारताच्या कल्पना करतो. सत्ताधारी नेते विकासपर्व जाहीर करतात. पण उद्याचा भारत चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती साठी आपली काय तयारी आहे ? यासंबंधी शासनाकडून काही ठोस उपाययोजना होतायत का ? मिळेल त्या मार्गाने पैसा कमविणे हेच करियर समजणारी पिढी तयार होते आहे? हे चिंताजनक नाही काय ? याबाबतीत अत्यंत महत्वाचे असणारे शालेय शिक्षणाच्या नियोजनाचे वाभाडे काढले जात आहेत. दररोज काहीतरी विचित्र बदल.याने मनुष्यानिर्माण होईल का ? म्हणून दुर्दशेचे बाप ब्रह्मचारीच राहतात.
आम्हाला काय त्याचे ?
एकूण विचार करता निष्कर्ष हाच निघतो कि, सत्ता मिळवणे, वैयक्तिक संपत्ती निर्माण हेच नेतेमंडळीचे उद्दिष्ट्य दिसते. त्यासाठी देशहिताला दुय्यम स्थान द्यायला हि लोक कमी करणार नाही. आम्हाला काय त्याचे ? या तीन शब्दात सर्व परिस्थितीचे विश्लेषण स्पष्ट होते.म्हणूनच तर या देशात दुर्दशा जन्माला आली. देशाचे काहीपण होवो यांना काहीच फरक पडत नाही. कारण देशहिताची इच्छा असती तर असामान्य कार्ये प्रत्यक्षात येतात. आपल्याकडे याच्याउलट उदाहरणे बघायला मिळतात जसे कि , कोट्यावधींचे कर्ज विनातारण मिळू शकते, घोटाळ्यात आरोपी म्हणून तुरुंगात जावे लागले तरीपण संसदेच्या विविध विषयाच्या स्थायी समितीवर सन्मानाने नेमणूक होऊ शकते इ. कारण फक्त इच्छा. आणि म्हणूनच सर्व गैरव्यवहार, भ्रष्टाचार करून देशात दुर्दशेला जन्माला घालून हे लोक ब्रह्मचारीच...

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!