राजकीय इच्छाशक्तीतून मनुष्यनिर्मानाच्या व्यवस्थेकडे

0

प्रत्येक देश,प्रत्येक समाज अहोरात्र एकाच गोष्टीचा घंटानाद करत असतो किंवा टाहो तर नक्कीच फोडत असतो ती म्हणजे विकास.विकास हा एकच असा मुद्दा असावा कि तो कायम चर्चेत आहे मग ते गावातली चावडी अहो किंवा देशाची संसद. देशातील सर्व तज्ञ मंडळी या एकाच उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करण्याची धडपड करत आहे. मग एवढी चर्चा होऊनही आजपर्यंत आपण समाधान मानावे अश्या परिस्थितीपर्यंत का नाही पोहोचलो ? मानव विकास निर्देशांक वगैरे लांब राहिले आपण साध्या रस्ते,वीज आणि पाणी या मुलभूत गरजापण पुरवू शकत नसू तर नक्किच संकट गंभीर आहे. यादीच करायची ठरवली तर एक प्रबंध होईल पण त्याने मुलभूत प्रश्न दूर होणार नाही. जर इतिहासात डोकावल्यास तर असे लक्ष्यात येईल कि प्रत्येक बदलाचे, विकासाचे जे मुख्य सूत्रधार होते त्यांच्यात विकासाची प्रचंड व प्रामाणिक इच्छाशक्ती होती ती आजची राज्यकर्त्यांमध्ये अजिबात दिसत नाही. याला कारण कदाचित आपली मनुष्यानिर्मानाची व्यवस्था असेल. आपण राष्ट्रीयत्व,देशाभिमान, वैयक्तिक चरित्र ,समर्पण हि मुल्ये प्रत्येक भारतीया मध्ये रुजविण्यात अपयशी ठरलो आहोत असेच म्हणावेसे वाटते. याचा पुरावा म्हणजे येथील आजचे भयाण वास्तव आहे.
सगळीकडे एकच मंत्र सांगितल्या जातो. "हे असेच आहे आणि याला कोणीच बदलवू शकत नाही. जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला आयुष्यातून उठवले जाईल." (याचेही अनेक उदाहरणे देत येतील) मग तो पण बिचारा पठडीतले जीवन जगतो.स्वत:भोवती एक रेषा आखुन घेतो. ज्या शिक्षण व्यवस्थेतून आदर्श मनुष्यनिर्माणाची प्रक्रिया चालते ती आज पगार व परीक्षा या दुष्टचक्रामध्ये गटांगळ्या खात आहे. जबाबदारी कोणालाच नको आहे. जो तो फक्त सुखोपभोगाची भाषा बोलतो आहे. आणि तेही तातडीने जमेल त्या मार्गाने. इतरांच्या दु:ख समस्येचे आपल्याला काय करायचे ? आपण फक्त खा,प्या, मजा करा हि भोगवादी विचारसरणी वाढत जात आहे.मला असे वाटते कि, हि खरी समस्या आहे. कदाचित असेही वाटेल कि या कल्याणकारी कायद्याच्या राज्यात असल्या मुल्यशिक्षनाचे महत्व काय पण मुख्य बाब हि आहे कि कायदा तर आहे पण मुळात मनुष्य प्रगल्भ नसेल तर तो त्यातून पळवाटा काढतोच. कायद्याचे रक्षकच कायदा पाहिजे तसा वाकवतात.प्रगल्भ नागरिक हाच विकसित राष्ट्राचा पाया असतो. असा नागरिक आपल्या कोणत्याच गरजेसाठी भ्रष्टाचार,दुष्कृत्य करणार नाही. यासाठी मनुष्यनिर्माणाचे शिक्षण अत्यावश्यक आहे. म्हणून जर आपल्याला प्रारंभी प्राथमिक शिक्षणावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यासाठी शिक्षक हा केंद्रबिंदू ठेवून त्याला प्रशिक्षितच नव्हे तर देशाचे भविष्य घडविणाऱ्या कुशल मुर्तीकारामध्ये रुपांतर करावे लागेल.
सरकारी शाळा,कौलेज मध्येच जर दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर शिक्षणसम्राट तयारच होणार नाहीत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल. आदर्श राज्यकर्ते तयार होतील. जे कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, कुणाचेही मुजोर न होता प्रशासन चालवतील. अधिकारी वर्ग प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतील. अपराध्यांना कडक शासन करतील. भय,भूक व भ्रष्टाचार संपवतील आणि समाज फक्त आर्थिक,सामाजिक पातळीवर तर सक्षम होईलच पण यासोबतच एक राष्ट्रीय भावना निर्माण होईल आई हि भावना अधिक समंजस, मजबूत असल्याने राष्ट्र उभे राहील.
हे काही फक्त मुंगेरीलाल के हसीन सपने नाहीत.तर हे होऊ शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. याचे कारण असे कि प्रामाणिक आणि प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर कुठलेही अवघड काम अगदी सोपे होते. याचे अनेक उदाहरणे आपल्या परिसरात बघता येतील. सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोडशेडींग पाठ सोडत नाही.रस्त्यांची तर बोम्बच आहे. पण माझे परभणी जिल्यातील मानवत हे गाव या संकटापासून मुक्त आहे.मानवतचे मा.श्री. बालकिशनजी चांडक यांच्या दूरदृष्टीमुळे आमच्या गावात गेल्या ३० वर्षांपासून जायकवाडी धरणातून नियमित पिण्याचे पाणी मिळते. या वर्षी जायकवाडीत पाणीसाठा अत्यल्प असल्याने श्री. चांडक यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून पर्यायी स्त्रोताची व्यवस्था करून ठेवली आहे.म्हणजे भर उन्हाळ्यातही गावाला पिण्याचे पाणी मिळणार आहे. तसेच माझे गाव पूर्णत : भारनियमन मुक्त आहे. शहरात सर्वत्र पक्के रस्ते आहेत. हे सर्व होऊ शकले कारण प्रखर व प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती. अशीच राजकीय इच्छाशक्ती देशातील राष्ट्रीय नेत्यांमध्ये होऊन त्यांनी शिक्षण व्यवस्थेत मुलभूत बदल घडवून मनुष्यनिर्माणाची मजबूत व्यवस्था निर्माण करतील या अपेक्षेनेच हा लेखनप्रपंच.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!