आधुनिक तंत्रज्ञानाच्या जाळे आता सर्वदूर पसरले आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे जाळे विस्तारले आहे. राजकारण, उद्योग, शिक्षण ,आरोग्य आणि संवाद व माध्यमाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध झाल्याने समाजाच्या सर्व स्तरावर त्याचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला गेला.
जनसंवादाच्या क्षेत्रात तर आमुलाग्र बदल झाले दिसत आहेत. आकाशवाणी, वृत्तपत्र यासारख्या जनसंवादाच्या प्रमुख साधनात एकमार्गीपणाच्या मर्यादा आहेत. सोशल मिडीया ने या मर्यादावर विजय मिळवला. सोशल मिडीया सारख्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे व्यक्त होणे सहज शक्य झाले आणि धोरणकर्ते, उद्योजक यांनाही जनतेच्या मनातील भावना थेटपणे लक्षात घेता येणे शक्य झाले. सोशल मीडियाची ही अफाट क्षमता लक्षात आल्याने अल्पावधीतच सोशल मिडीया हे जनसंवादाचे, राजकीय पक्षांच्या प्रचाराचे आणि उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे प्रमुख साधन बनले आहे. यशापयशाचे मापन लाईक्स,शेअर आणि कमेंट बनले आहे.
क्षणाक्षणाला मिळणाऱ्या अपडेट्समुळे माहितीचा विस्फोट झाला अन जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती सहजगत्या मोबाईलवर उपलब्ध झाली. सोशल मिडीया चा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाजाला सशक्त व्यासपीठ मिळाले. त्यांचा आवाज ऐकला जाऊ लागला. त्याची दखल घेतली जाऊ लागली. तसेच परस्परविरोधी विधाने करणाऱ्याची अडचण होत आहे. असे प्रकार कोणी केले तर आज सोशल मिडीयामुळे त्यास लगेचच आठवण करून दिली जाते. एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत असो वा एखाद्या रुग्णास रक्ताची वा अन्य आरोग्यविषयक मदत असो सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे अनेक उदाहरण आहेत. लिंक्ड ईन सारख्या नेट्वर्किंग साईट्स चा उपयोग हा उद्योगजगतासाठी मनुष्यबळ मिळवण्यासाठी करण्यात येत आहे.
त्यामुळे माहितीची सहजतेने उपलब्धता, नेटवर्किंग, मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या वर्गाला मिळालेले सशक्त व्यासपीठ आणि या सर्वांचा राज्यकर्त्यांवर, उद्योगक्षेत्रावर होणारा प्रभाव या सोशल मीडियाच्या जमेच्या बाजू आहेत.
प्रत्येक प्रयोगाला,शोधाला जश्या जमेच्या बाजू असतात त्याच प्रकारे काही दुष्परिणामही असतात. सोशल मीडियाच्या बाबतीत असणारे दुष्परिणामही आता प्रकर्षाने समोर येत आहेत. विशेषत: उदयपुर, अमरावती येथील निरपराध नागरिकांची निघृण हत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे सोशल मीडियावर केवळ समर्थन केले म्हणून दहशतवाद्यानी निरपराध नागरिकांना जीव मारले.
सोशल मिडीया चा सर्वात मोठा दोष म्हणजे बिनचेहऱ्याची माणसे. स्वत:ची खरी ओळख लपवून सोशल मिडीयाचा वापर करता येणे हा सर्वात मोठा धोका आहे. कारण गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यासाठी ओळख लपवणे हे एकप्रकारे वरदानच आहे. अशा पद्धतीने सोशल मिडीयावर खाते उघडून भावना भडकावणारा मजकूर प्रसारित केला की , देशाच्या कुठल्याही भागात दंगल घडून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. देशात असेही प्रसंग अनेक ठिकाणी घडले आहेत.
काही दहशतवादी कृत्यांच्या पोलीस तपासात असेही लक्षात आले ही की, दहशतवादी गटाचे म्होरक्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजातील तरुणवर्ग, विद्यार्थी याना लक्ष्य बनवतात. संवादाच्या माध्यमातून त्यांच्याशी जवळीक साधली जाते. अत्यंत सावकाशपणे त्यांची माथी भडकावली जातात. आणि दहशतवादी कृत्य करण्यास त्याना भाग पाडले जाते. देशविघातक कृत्ये करण्यासाठी आपला केवळ उपयोग केला गेला याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. फुटीरतावादी विचारांचे विष सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवले जात असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत कमी प्रयत्नात, कमी वेळात मोठ्या वर्गाशी जोडता येणे शक्य असल्याने तसेच विचारांशी साम्य असलेल्या व्यक्तींना जोडता येणे शक्य असल्याने विध्वंसकारी समूह सोशल मिडीयाच्या माध्यमाचा दुरुपयोग करतात.
दुरुपयोग का होतो ?
सोशल मिडीयाचा दुरुपयोग का होतो या प्रश्नाचे उत्तर अगदी उघड आहे. ते म्हणजे, राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आणि त्याबद्दल कायद्यात कुठेही शिक्षेची तरतूद नसणे. सोशल मिडीयाच्या बाबतीत मुळात वापरकर्त्याची ओळख हाच आक्षेपाचा मुख्य मुद्दा आहे. ओळख पटल्यानंतर कारवाईची प्रक्रिया चालू होते. ती किती जटील आहे हे वेगळे सांगायला नको. बनावट खात्याच्या आधारे आक्षेपार्ह, अश्लील , टीकाटिप्पणी सर्रासपणे केली जाते. जात, धर्म, भाषा, लिंग व प्रांत या मुद्द्यावरून विषमतावादी मजकूर अगदी उघडपणे प्रसारित केला जातो. धार्मिक , राजकीय अथवा सामाजिक व्यक्तींचे चारित्र्यहनन अशा बनावट खात्यांच्या माध्यमातून अगदी उघडपणे केले जाते. ही संख्याच एवढी अव्याढव्य असल्याने त्याविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करणेही सोपे काम नाही.
प्रामुख्याने फेसबुक आणि ट्विटर सोशल नेट्वर्किंग साईट्स चालवणऱ्या परदेशी कंपन्या केवळ नफा कमावण्यासाठी चालतात आणि भारत ही त्यांच्यासाठी जगातील प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे बनावट खात्यांमुळे भारतातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असेल तर त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा केंद्र सरकारने सोशल नेट्वर्किंग कंपन्यासाठी नियमावली आणली तेव्हा त्यास अनुसरण्यास अजूनही आढेवेढे घेतले जात आहेत. बनावट खात्यावर प्रतिबंध घातले किंवा बंद केले तर हा निर्णय सोशल नेट्वर्किंग कंपन्यासाठी तोट्याचा असणार आहे. मग भलेही देशात दंगली, जाळपोळ होवो अथवा निरपराध नागरिकांची हत्या होवो. कदाचित म्हणूनच सोशल नेट्वर्किंग साईटसच्या वापरा संदर्भात दुरुपयोग होऊ नये म्हणून नियमावली तयार करण्याचा प्रयत्न झाला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जात असल्याची आवई उठवली जाते.
उपाययोजना
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना विविध क्षेत्रातील आव्हानांचा विचार करून त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. सोशल मिडीया ही जनसंवाद क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती असली तरी त्यातील आव्हाने ही मोठी आहेत. बनावट खाते आणि त्यामाध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग ही सोशल मिडियातील सर्वात मोठी समस्या आहे. दहशतवादी,फुटीरतावादी गटांना सोशल मिडीया हे एक नवे शस्त्र सापडले आहे. त्यासाठी सर्वात अगोदर प्रत्येक वापरकर्त्यांसाठी ओळख पडताळणी आवश्यक केली पाहिजे. ज्याक्षणी हा उपाय अमलात आणला जाईल त्याचक्षणी लाखो बनावट खाती एका क्षणात संपुष्टात येतील. प्रत्येक वापरकर्ता अत्यंत जबाबदारीने सोशल मिडीयाचा वापर करेल. आपल्या मजकुरातून देशविघातक कारवायांना प्रोत्साहन मिळणार नाही याची जबाबदारी त्या वापरकर्त्यावर असेल आणि अशा स्थितीतही कोणी दुरुपयोग केलाच तर त्यावर कायदेशीर कारवाई करणेही सोपे होईल.
यासंदर्भात सोशल नेट्वर्किंग कंपन्याकडून वापरकर्त्याच्या माहितीचा दुरुपयोग केल्या जाण्याचा आक्षेप घेतला जाऊ शकतो. पंरतु नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा बळी दिला जाऊ शकत नाही. देशाच्या अखंडता आणि संप्रभृतेपेक्षा नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोठे असू शकत नाही. म्हणून ज्यांना स्वत:च्या माहितीचा दुरुपयोग होईल असे वाटते त्यांनी सोशल मिडीयाचा वापर टाळावा हाच त्यावर उपाय आहे.
एकूणच सोशल मिडीया ही डिजिटल क्रांती असली तरी त्याला नियमावली च्या कोंदणात बसवले तरच लोकशाहीला ते शोभिवंत दिसेल अन्यथा अनियंत्रित सोशल मिडीया ही भविष्यातील अराजकाचा पाया बनेल यात शंका नाही.