राहुल गांधींची पॅव्हेलियन मधील कॉमेंट्री

0

#RahulGandhiNews : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात लिहिलेला लेख देशातील अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करणारा लेख वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करणे हे लोकशाही केवळ जीवंतच नाही तर अतिशय धडधाकट असल्याचा पुरावा आहे. त्याबद्दल समस्त लोकशाहीप्रेमींचे मनापासून अभिनंदन.  

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात मोठा घोळ झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामध्ये केला आहे. यातही आनंदाची बाब अशी की, संपूर्ण लेखात त्यांनी ईव्हीएम वर थेटपणे आरोप केला नाही. म्हणजे त्यांच्या लेखाने लोकशाही कमकुवत होणे आणि ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करता येतो हे दोन्ही दावे निकाली निघाले.


टक्केवारी वाढणे विशेष बाब नाही  

गांधी यांचा मुख्य आक्षेप आहे तो मतदारसंख्या, मतदान आणि वाढलेली टक्केवारी संदर्भात. त्यांच्या म्हणण्यानुसार पाच वाजेच्या नंतरही मतदान झाले. यासंदर्भात सर्वसामान्य व्यक्तीला माहित असलेला नियम म्हणजे मतदान केंद्राच्या १०० मीटर रेषेच्या आत पाच वाजेपर्यंत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. विधानसभा निवडणुकीला अनेक ठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत मतदान झाले आहे. याचे महत्वाचे कारण असे की, अनेक ठिकाणी मतदार दुपारनंतर मतदानासाठी घराबाहेर पडतो. त्यातील अनेकांना राजकीय पक्षाकडून, उमेदवाराकडून आर्थिक लाभाची अपेक्षा असते असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. त्यामुळे पाच नंतर मतदान वाढले आणि दुसरे दिवशी सकाळी मतदानाची टक्केवारी वाढली यात किंचितसुध्दा नवल नाही.


बनावट नावे टाळण्यासाठी बायोमेट्रिक ओळख आवश्यक                  

गांधी यांनी मतदारयादीत खोट्या मतदार वाढल्याचे म्हटले आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना विविध प्रकारचे पुरावे सादर करावे लागतात. मतदान अधिकारी/केंद्राध्यक्ष यांनी परवानगी नाकारलेल्या व्यक्तीस मतदान करता येत नाही. बनावट मतदार म्हणजे एकाच व्यक्तीचे अनेक ठिकाणी नवे असणे. हे टाळण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे. तो म्हणजे आधार कार्ड मतदार यादीशी लिंक करणे.  ज्यावेळी मतदाराची बायोमेट्रिक ओळख पटून मतदान होईल त्याचवेळी मतदार यादीतील नावांची पुनरावृत्ती टळू शकेल. यासंदर्भात निवडणूक आयोगाने मतदार यादी आधार लिंक करण्याचे ठरवले होते. मात्र आधार सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. परिणामी हे शक्य झाले नाही. 

 

अधिकारी कर्मचाऱ्यावर अविश्वास  

निवडणूक प्रक्रीयेसंदर्भात आरोप करताना अथवा शंका उपस्थित करताना गांधी यांनी अथवा त्यांच्या सल्लागारानी एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, निवडणूक प्रक्रीयेत उच्चपदस्थ सनदी अधिकारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक यासह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश असतो. मतदार यादीत नावे समाविष्ट करणे अथवा काढणे, नामांकन अर्ज स्वीकारणे येथपासून ते मतमोजणी आणि निकाल येथपर्यंत सर्व काही उघडपणे, सर्वांच्या साक्षीने होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर आरोप करताना यातील सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर आरोप करण्यासारखे आहे. हे सर्वच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत का ? किंबहुना असले तरी त्यांना मतदान प्रक्रियेत घोळ करण्याएवढे स्वातंत्र्य मिळू शकते का ? आणि समजा ते करत असताना काँग्रेस पक्षातील नेते, कार्यकर्ते समर्थक पत्रकार मुग गिळून गप्प होते का ?


आरोपाऐवजी चिंतन आवश्यक  

खरे पाहता राहुल गांधी यानी सर्वात प्रथम पक्षाचा पराभव झाल्याचे मनापासून  मान्य केले पाहिजे. व त्यांना मिळणाऱ्या सततच्या पराभवाबद्दल  आत्मचिंतन केले पाहिजे. राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने हे काम स्वत:च करणे आवश्यक आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र नेमकी याच्याउलट आहे. पक्षाची इतकी बिकट अवस्था असताना गांधी यांचे टुरिझम काही संपत नाही. गुजरात मध्ये अधिवेशन प्रसंगी हेच दिसून आले. नागरिकांना व विशेषत: युवा मतदारांना रिझल्ट ओरिएन्टेड काम हवे असते. भाजप सरकारमध्ये ते दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे धोरणलकवाग्रस्त सरकार ज्यांनी पाहिले आहे, त्यांना हा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे कधी ईव्हीएम, निवडणूक प्रक्रिया आणि काहीच नसले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर या चार बिंदूच्या पलीकडे राहुल गांधी यांची झेप जात नाही. ही वस्तुस्थिती राहुल गांधी यांनी लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत व्याधीचे निदान होत नाही, तोपर्यंत औषधोपचार लागू होणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला भविष्यात टिकून रहायचे असेल तर राहुल गांधी यांनी आरोप करण्याऐवजी चिंतन केले पाहिजे. अन्यथा त्यानी मच फिक्सिंग बद्दल व्यक्त केलेल्या भावना म्हणजे पव्हीलीयन मधील कोमेंट्री पेक्षा जास्त दखल घेण्यासारख्या नसतील.    

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!