सामनाचे संपादकीय लोकसत्तामध्ये ?
आणीबाणीच्या निषेधार्थ रामनाथ गोयंका यांच्या नेतृत्वाखाली इंडियन
एक्स्प्रेस या आघाडीच्या वृत्तपत्राने संपादकीयाची जागा रिकामी ठेवली होती. हा
संदर्भ आठवण्याचे कारण, सोमवार,
दि.७ जुलै रोजी एक्स्प्रेस समूहाच्या लोकसत्ता या वृतपत्रातील
प्रसिद्ध झालेले संपादकीय. खरेतर शिवसेना ठाकरे गटाच्या सामना या वृतपत्रातील
संपादकीय चुकून लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केले आहे की काय अशी शंका निर्माण झाली.
ठाकरे बंधूंचे एकत्रित येणे या घटनेला उत्साहवर्धक घटना म्हणून
संबोधून ठाकरे बंधुंस धन्यवाद देणे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राजकीय क्षेत्रात युती, आघाडी, बिघाडी, फाटाफूट हा सर्व घटना नित्याच्याच आहेत.
त्यामुळे धन्यवाद देऊन शुभेच्छा देण्याचा प्रकार यापूर्वी लोकसत्ताच्या
संपादकीयातून घडलेला दिसत नाही. मुळात दोघे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे येणाऱ्या सर्व
निवडणुका दोघे एकत्र मिळून लढवतील आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या सरकारला उलथून पाडतील असा अंदाज बांधून टाळ्या अशी स्वप्ने एका
भाबड्या कार्यकर्त्याची असू शकतात. एक्स्प्रेस समूहातील वृत्तपत्राच्या संपादकाची नव्हे. कारण, दोघा भावंडांचे राजकीय अस्तित्व
स्वतंत्र आहे. पक्ष वेगळे आहेत. त्यामधील नेते व कार्यकर्त्यांच्या राजकींय
महत्त्वकांक्षाही विस्तारलेल्या आहेत. अशा स्थितीत एकत्र येऊन निवडणुका लढवणे व
विजय प्राप्त करण्याचा क्षण कार्यकर्त्याच्या दृष्टीपथात असू शकतो साक्षेपी संपादकास
नव्हे. भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्ष फोडला याचे अतीव दु:ख संपादकाच्या
लेखणीतून उतरले मात्र ज्या पक्षासोबत निवडणुका एकत्रित लढवल्या, प्रचार केला व जिंकल्या सुद्धा त्या पक्षासोबत असणारी युती
तोडून ज्यांच्याशी वैचारिक नाळ जोडणे कधीही शक्य नाही अशा पक्षासोबत मांडीला मांडी
लावून बसण्यात कसलीही अनैतिकता दिसू नये हे कार्यकर्त्याला शोभते निष्पक्ष
संपादकास नाही.
प्रस्थापित विरोधी मत मांडणे हे पत्रकारितेतील कर्तव्य पार पाडताना
संपादकाने व्यापक जनहित हा केंद्रबिंदू विसरता कामा नये अशी अपेक्षा असते. मात्र
दै. लोकसत्ताने शासकीय धोरणावर प्रहार करताना विरोधी पक्षाचे प्रवक्तेपण घ्यावे
यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकते. संपादकीयातून सामान्य जनतेच्या
प्रश्नासंबंधी वकिलपत्र घेऊन बाजू मांडावी की विरोधी पक्षाच्या प्रत्येक मागणीला, धोरणाला ओढूनताणून वैचारिक
अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करावा ? यापुढे जाऊन विरोधी
पक्षावर सत्ताधारी पक्षाने केलेल्या टीकेला संपादकीयातून उत्तरे दिली जात आहेत आणि
प्रखरपणे बाजू मांडली जात आहे. एखाद्या गल्लीबोळातील वर्तमानपत्राने किंवा सामना
वृत्तपत्रातून अशा पद्धतीने संपादकीय लिहिल्यास त्यात काहीच आश्चर्य वाटले नसते,
परंतु रामनाथ गोयंका यांच्या पत्रकारितेचा वारसा असणाऱ्या
एक्सप्रेस समुहातील वर्तमानपत्राने अशा पद्धतीने प्रचारकी लिखाण थेट संपादकीयातून
करणे हे त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेच्या दाव्याला खोडणारे आहे.
राहता राहिला प्रश्न मराठी भाषा व हिंदी भाषेच्या सक्तीचा. तर भाषा
जपणे हे त्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ज्याची मातृभाषा मराठी आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळावर टीका करून मराठी
भाषा संरक्षणाचे काम होणार नाही. आपल्या घरात, कार्यालयात, खरेदी-विक्री करतेवेळी संवाद
साधताना मराठी भाषेचा आग्रह मराठी भाषिकांनीच सोडून दिला आहे. शहरी भागात तर हे
सर्रासपणे दिसून येते. याहून वाईट म्हणजे हिंदी, इंग्रजी बोलनाऱ्यास आधुनिक समजले
जाणे आणि त्यामुळे आधुनिक बनण्याच्या प्रवाहात मराठी भाषिकांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषा आत्मसात करणे हे मराठीचे
खरे दुर्दैव आहे. प्रत्येक नागरिकाने एकापेक्षा जास्त भाषा शिकाव्यात. जागतिकीकरणाचा
विचार करता इंग्रजीचे महत्व अधोरेखित होते. मात्र देश म्हणून विचार करता देशातील
सर्व नागरिकांना परस्परांशी संवाद साधताना एक भाषा बोलता, वाचता यावी हे महत्वाचे
आहे. राष्ट्रीय भाषा हे राष्ट्रीय एकात्मतेचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्रिभाषा
सूत्र हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे. लोकसत्ताच्या संपादकीयातून
व्यापक राष्ट्रहीत ,जनहिताची भूमिका अपेक्षित होती.
मजकुराचा शेवट तर तर्क आणि पत्रकारितेच्या मूल्यांना पायदळी तुडवूनच
केला आहे. मराठी जनांनी राम गणेश यांच्या संगीत भाऊ बंधनाचा आस्वाद घेण्याचा सल्ला
दिला आहे. राम गणेश यांच्या नावापुढे चांद्रसेनीय कायस्थ असा उल्लेख करण्यात आला
आहे. येथे जातीचा उल्लेख कोणत्या व्यापक हेतूने करण्यात आला ते कळत नाही.
ठाकरे बंधू हे चांद्रसेनीय कायस्थ आहेत म्हणून त्यांच्याच जातीतील
कलाकाराचा कलाप्रकार अनुभवावा असे सुचवायचे असेल तर जे नागरिक आपल्याच जातीमधील
संतांची रचना ऐकतात, आपल्याच जातीमधील शूर योद्धा इतरांपेक्षा मोठा आहे असे मानतात,
आपल्याच जातीमधील कलाकार सर्वोच्च गुणवत्तापूर्ण आहे असे मानतात, आपल्याच जातीमधील
वैद्यकीय व्यावसायिकाकडून उपचार घेतात, आपल्याच जातीमधील व्यापाऱ्याकडून खरेदी
करतात अशा सर्वांची धारणा योग्य आहे असेच संपादकाना म्हणायचे असेल किंवा ते सुध्दा
त्याच विचारधारेचे असतील.
एकूणच संपादकीय म्हणून
प्रसिद्ध झालेला मजकूर रामनाथ गोयंका यांच्या आदर्श पत्रकारितेचे धिंडवडे काढणारा
आहे.