पुण्याहून परभणी कडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील एका प्रवाशानी खिडकीतून काहीतरी वस्तू बाहेर फेकल्याचे शेतात काम करणाऱ्यानी बघितले. प्रत्यक्षात ती वस्तू दुसरे तिसरे काही नसून एक मृतप्राय नवजात अर्भक होते. ही माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास कळवण्यात आली आणि तातडीने त्या मातेस ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे त्या मातेसोबत पिताही होता. प्राथमिक माहितीनुसार दोघांचा विवाह झाला नव्हता. म्हणजेच अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या या बाळाला जन्मानंतर अवघ्या काही कालावधीमध्ये अतिशय क्रूर मृत्यूला सामोरे जावे लागले. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार प्रवासात असतानाच प्रसूती झाली. तिच्या सांगण्यावरून बाळ मृत जन्माला आले आणि म्हणून बाहेर फेकून देण्यात आले. एखाद्या काल्पनिक चित्रपटातील वाटावी अशी घटना परभणी जिल्ह्यात प्रत्यक्षात घडली. या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होतात. खरेतर हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु खासगी बस मध्ये प्रसूती होत असताना इतर प्रवाशांना, चालक, वाहकांना त्याची सुतराम कल्पना येवू नये, व प्रसूती झाल्यानंतर प्रवासादरम्यान कुठेही रुग्णालयात जाण्याची आवश्यकता पडू नये हे आश्चर्यकारक आहे. आणि समजा मृत अर्भक जन्मले तरी जगातील कोणते माता पिता त्या निष्पाप देहाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावतील ? त्यामुळे या प्रकरणात एकूणच मुळापासून पोलीस तपास होणे आवश्यक आहे. आणि स्वतःच्या अनैतिक कृत्यांना झाकण्यासाठी एका निष्पाप देहाची विटंबना केल्याबद्दल कडक शिक्षा व्हायला हवी. कारण ही माणुसकीची हत्या आहे.
या सर्व घटनांचे मुळ आधुनिकतेच्या बदलत चालेल्या व्याख्येत आहे. स्वैराचारालाच आधुनिकता म्हणले जात आहे. तोकडे कपडे, व्यसनाधीनता, अनिर्बंध लैंगिक सुख हे आधुनिकतेचे परिमाण बनले आहेत. आणि दुर्दैव म्हणजे चित्रपट, मालिका, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमातून याला मान्यता प्राप्त करून दिली जात आहे. एकदा का ही मानसिकता तयार झाली की, ते प्राप्त करण्यासाठी पळण्याची जीवघेणी स्पर्धा सुरु होते. त्याने केले म्हणून मी केलेच पाहिजे अन्यथा आपण आधुनिकतेच्या वर्तुळाबाहेर पडू असा समज दृढ झालेला असतो. परिणामी आधुनिकता विचारात, बोलण्यात, अभ्यासात आहे की तोकड्या कपड्यात याचाही विचार केला जात नाही. चारित्र्यसंपन्न असण्यापेक्षा शरिरिक आकर्षण महत्वाचे वाटते आणि व्यायाम करून शरीरसंपत्ती कमवण्यापेक्षा सिगारेटचे झुरके म्हणजे आधुनिक झाल्याचे प्रमाणपत्र असल्याचा भास होतो.
आपण कशासाठी आलो आहोत ? आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे ? आपल्याला काय पाहिजे ? अशा सारासार विवेक हरवतो आणि शिक्षण आणि नौकरी साठी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी व विशेषकरून मुली या अंधानुकरणाला बळी पडतात. आपल्या पाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी बनावे हे प्रत्येक पित्याचे केवळ स्वप्न नसते त्याच्या तर आयुष्याचे ध्येय असते. अपत्य जन्माला आल्यापासून तो केवळ आणि केवळ पाल्यासाठीच जगत असतो. आणि मुलगी असेल तर मग काकणभर जास्तच काळजी असते. तिचे शिक्षण, करियर, नौकरी यासाठी स्वतःची शारिरीक, आर्थिक क्षमता पणाला लावतो. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन प्रसंगी कर्जही काढतो पण आधुनिकीकरणाचे अंधानुकरण करताना पाल्याचे एक चुकीचे पडलेले पाऊल, मोहाचा एक क्षण आयुष्याचे मातेरे करतो. पालकांच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. अशा घटनाचा इतिहास हेच सांगतो की, अनैतिक कृत्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांपेक्षा मुलींचे नुकसान अधिक होते. शरीरावरील आघातापेक्षा मनावरील आघाताचे ओझे आयुष्यभर वाहावे लागते. समाजाचा, नातेवाईकांचा मानसिक त्रास मुलीनाच सहन करावा लागतो.
सदगुण, नैतिक संस्कार याची शिकवण देण्याविषयी पालकच अनभिज्ञ असल्याचे अनेक घटनामधून दिसून येते. पालकांनाच आधुनिकतेची खरी ओळख नसल्याने अंधानुकरण करण्यासाठी घरातूनच प्रोत्साहन मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आधुनिकता संस्कारातून वागण्या-बोलण्यातून, चांगल्या सवयीतून, अभिव्यक्त होत असते हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही महापुरुषाचे चारित्र्य बघितले तर त्यामधून हेच दिसून येईल. महानता उत्तम चारित्र्य, त्याग, समर्पण, कर्तव्यपरायणता, अभ्यास, निर्व्यसनी असण्यातूनच निर्माण होत असते हे समजून घेतले पाहिजे.
आधुनिकीकरण्याच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी पडून अंधानुकरण करताना अनैतिक कृत्ये घडतात आणि त्याचा शेवट हा माणुसकीची हत्या करण्यात होतो. पालकांना, शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, नौकरी करणारे मुले-मुली यांना वेळीच सावध करणारी ही घटना आहे. यामधून वेळीच बोध घेऊन पाऊल चुकत असेल तर स्वतःस सावरले पाहिजे.